कोवीड-19 विविध प्रश्न आणि त्याची उत्तरे

कोविड -१९ बद्दल माहिती करून घ्यावे असे –
आपल्याला फ्लू होतो. सर्दी खोकला ताप येतो. त्याला कधी कधी विशिष्ठ प्रकारचे विषाणू जबाबदार असतात. जीवजंतू किंवा जीवाणू साधारणपणे मायक्रॉन या आकाराचे असतात. म्हणजे मिलीमीटरपेक्षा हजारपट छोटे असतात. आपल्या शरीरातील पेशीही त्याच आकाराच्या असतात. विषाणू किंवा व्हायरस जीवाणूंपेक्षा शंभरपट लहान असतात 0.004 ते 0.1 मायक्रॉन इतके लहान असतात. म्हणजे मीटरच्या एक लाख पट लहान. आपल्या शरीरात फ्लू निर्माण करणारे 200हून अधिक प्रकारचे विषाणू आहेत. त्यातला मुकुटासारखा दिसणारा म्हणून या विषाणूला कोरोना नाव देण्यात आले. कोरोना प्रकाराचे वेगवेगळे विषाणू आहेत त्यातला एक नवा विषाणू म्हणजे nCov-19. त्याच्यामुळे होणाऱ्या रोगाचे नाव कोविड -१९


कोविड -१९कसा सापडला ?
कोविड -१९ हा व्हायरस किंवा विषाणूजन्य आजार आहे. तो श्वसनमार्गाला होतो. पहिल्यांदा चीनच्या हुबेई प्रांतात वुहान या शहरात तो आढळून आला. डिसेंबर 2019 पासून त्याची लागण वुहान मधील लोकांमध्ये पसरली. तेथे आजारी पडलेल्यांमध्ये न्यूमेनिया सारखी पण तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसून आली. त्याच्यावर नेहमीचे उपचार लागू पडत नाहीत यावरून हा वेगळा नवा रोग असल्याचे निदान करण्यात आले. आरोग्य तज्ज्ञ या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करीत आहेत कारण या नवीन विषाणूबद्दल फारसे माहिती नाही. या विषाणूमुळे गंभीर स्वरूपाच्या रोगाची साथ पसरण्याची शक्यता वाटल्याने तसा इशारा देण्यात आला.


कोविड -१९चा प्रसार कसा होतो आणि त्याची लक्षणे कोणती?
कोविड -१९हा मुख्यत: श्वासोच्छवासाच्या वाटे – शिंक किंवा खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या किंवा शेंबडाच्या थेंबांतून पसरतो. एखाद्या बाधीत व्यक्तीच्या जवळ सहा फुटांच्या आत कोणी आले आणि त्यांचा या विषाणूंनी भरलेल्या थेंबांशी संपर्क आला तर याची लागण होण्याची शक्यता असते. मुख्यत: या वाटेने लागण होते. लागणीचा दुसरा मार्ग स्पर्श संपर्कावाटे. हा विषाणू असलेल्या पृष्ठभागाला किंवा वस्तूला शरीराचा किंवा कपड्याचा स्पर्श झाला की तेथील विषाणू आपल्या त्वचेला किंवा कपड्याला लागतात. आपण आपला हाताने स्वत:च्या चेहेऱ्यावर विशेषत: नाक, तोंड, गाल किंवा डोळ्यांपाशी नेला की स्पर्शामुळे कोव्हीड -१९ आपल्या शरीरात जाण्याची शक्यता असते. परंतु हा लागणीचा मुख्य मार्ग असल्याचे मानले जात नाही. कोविड -१९ची लागण झाल्यावर काही दिवसात ताप, खोकला, वाहणारे नाक आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी आजाराची लक्षणे दिसू लागतात.


कोविड -१९ची लक्षणे दिसण्यासाठी किती वेळ लागेल?
रोग निवारण आणि नियंत्रण केंद्राच्या सांगण्यानुसार कोविड -१९ची लक्षणे दोन दिवसांपासून चौदा  दिवसांपर्यंत केव्हाही दिसू शकतात. सावधगिरी म्हणून बर्‍याच देशांमध्ये प्रवासातून परतलेल्या लोकांसाठी 14 दिवसांचा अलगाव कालावधी आवश्यक मानला जातो.


कोविड -१ चा उपचार कसा केला जातो?
कोविड -१९साठी सध्या अधिकृतपणे मंजूर असे औषध नाही. या विषाणूची लागण झालेल्या लोकांमध्ये असलेली लक्षणे दूर करण्यासाठी विश्रांती, द्रवरूप आहार आणि तापाचे नियंत्रण यासारखी सहाय्यक काळजी घ्यावी. खोकला शमवणारी औषधे, ताप नियंत्रित करणारी औषधे, विश्रांती देणारी औषधे अशी रोग्याच्या रोग्याच्या लक्षणांप्रमाणे आवश्यक वाटणाऱी नेहमीची औषधे देण्यात येतात. गंभीर प्रकरणांमध्ये, महत्त्वपूर्ण अवयवांचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी काळजी घेणारे उपचार करणे आवश्यक ठरते.


या रोगाविरोधात लस आहे का?
नाही. सध्या लस उपलब्ध नाही. त्यासाठी संशोधन चालू आहे. प्रभावी आणि खात्रीशिर लस तयार होण्यासाठी किमान एक ते दिड वर्षांचा कालावधी लागेल


आपण आपला बचाव कसा कराल?
पुढील सवयींचा अवलंब करा: 


आपले हात साबणाने आणि पाण्याने कमीतकमी 15-20 सेकंद धुवा. जर साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तर कमीतकमी 60% अल्कोहोल असलेले हँड सॅनिटायझर वापरा.



आपले डोळे, नाक आणि तोंड यांना न धुतलेल्या हातांनी स्पर्श करणे टाळा. आजारी असलेल्या लोकांशी जवळचा 1 मीटरच्या आतला संपर्क टाळा. 



आपण स्वत:च आजारी असलात तर घरीच रहा. 



खोकताना किंवा शिंकताना रुमालाने – टिश्यूने तोंड झाकूनमग  तो टिश्यू कचरापेटीत टाका. त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावा. 



वारंवार स्पर्श केल्या जाणाऱ्या वस्तू आणि पृष्ठभाग यांची स्वच्छताा करा आणि नेहमीचे घरगुती क्लीन्झर वापरून निर्जंतुकीकरण करणे हा प्रभावी मार्ग आहे.



सध्या फ्लू आणि श्वसन रोगाचा हंगाम आहे आणि सूक्ष्मजंतूंचा प्रसार रोखण्यासाठी नियमित प्रतिबंधक कृती करणे योग्य ठरेल तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेली असल्यास ती औषधे घेत रहायला पाहिजेत.


फेस मास्क घालावा का? त्यामुळे लागणीपासून बचाव होईल का?
आपण आजारी असल्यास - जेव्हा आपण इतर लोकांच्या आसपास असाल तेव्हा फेसमास्क घालणे आवश्यक आहे. विशेषत: आपल्या खोलीत दुसरे काणी आहेत किंवा आपण प्रवास करताना आणि आरोग्य केंद्र, दवाखाना येथे जाण्यापूर्वी फेस मास्क जरूर वापरा. आपल्याला फेसमास्क घालण्यामुळे श्वास घेताना त्रास होत असेल तर तो घालू नका मात्र आपल्याला खोकला किंवा शिंक आली तर तोंड झाकून घेऊनच अशी कृती करावी. आपण अन्य रुग्णांच्या संपर्कात येत असाल तर रुग्णांच्यासमोर असताना फेसमास्क जरूर घालावा. त्यामुळे विषाणूचा प्रसार रोखला जाईल. आजारी असणाऱ्याने रोगप्रसार टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी. फेसमास्कची काळजी घेण्याचीही आवश्यकता आहे.


आपण आजारी नसल्यास – सतत फेसमास्क वापरण्याची गरज नाही. जोपर्यंत आपण एखाद्या आजारी व्यक्तीच्या सान्निध्यात येण्याची शक्यता नाही अशावेळी आपल्याला फेसमास्क घालण्याची आवश्यकता नाही. आपण रुग्णांच्या सेवेत असाल आणि ते फेसमास्क घालण्यास सक्षम नसतील तर आपण फेसमास्क वापरावा. फेसमास्कचा पुरवठा कमी असेल तर त्याचा अनावश्यक वापर टाळावा. डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक अशा काळजीवाहूंसाठी फेसमास्क जतन केले जावेत. त्यांना फेसमास्क मिळाले नाहीत तर तेच रोगी होतील मग इतर रुग्णांवर उपचार कोण करेल?


कुटुंबातील कोणी सदस्य गेल्या 14 दिवसांत दूर देशातून प्रवा करून आला असेल तर?
जर आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने गेल्या 14 दिवसांत लागण झालेल्या आणि जोखमीच्या देशांतून प्रवास केला असेल किंवा त्याला ताप, खोकला किंवा श्वासोच्छवासाचा आजार झाल्याचे वाटत असेल तर आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. थेट संपर्क साधण्याऐवजी फोनद्वारे संपर्क करा. निरोप द्या किंवा अप्रत्यक्ष मार्गाने म्हणजे ऑनलाईन कॉल करा किंवा संदेश द्या. प्राथमिक आरोग्य चिकित्सक त्याची दखल घेतील.


आपल्या कुटुंबातील सदस्याने हे करावे:


त्वरित वैद्यकीय सेवा मिळवा. 



डॉक्टरांच्या कार्यालयात किंवा आपत्कालीन कक्षात जाण्यापूर्वी, त्यांना कॉल करा आणि त्यांच्या अलिकडील प्रवास आणि लक्षणे सांगा.



इतरांशी संपर्क टाळा.



आजारी असताना प्रवास करू नका.



खोकला किंवा शिंकताना त्यांनी आपले तोंड व नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे. आपली शिंक किंवा खोकला हातावर पडू देऊ नये. 



रुमाल घेणे शक्य न झाल्यास अंगावरील कपड्याची बाही किंवा आस्तीन नाकातोंडासमोर आणून झाकून मगच खोकला किंवा शिंक काढली पाहिजे.



हात साबणाने आणि पाण्याने वारंवार 15 ते 20 सेकंद धुवा. साबण आणि पाणी उपलब्ध नसल्यास कमीतकमी 60% अल्कोहोलसह अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर वापरा.



आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवास करावा का?
आपण कोणत्या भागात प्रवास करत आहात तो भाग रोगासाठी किती धोकादायक आहे याची चाचपणी करावी. साथ आल्यामुळे जोखमीच्या ठरलेल्या भागातील प्रवास टाळण्याचा, पुढे ढकलण्याचा किंवा रद्द करण्याच्या प्रयत्न करावा. याला ट्रॅव्हल नोटिस म्हणतात. मिळणारा परतावा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात प्रवास करण्याच्या संभाव्य आरोग्याच्या जोखमीच्या मूल्यांकनावर आधारित असतात. प्रवासाच्या सूचनांसह गंतव्यस्थानांची यादी जाहीर केली जाते तिच्याकडे लक्ष ठेवा. 


वैयक्तिक कारणास्तव प्रवास करणे भागच असेल तर काय करावे?
आपण एखाद्या कारणास्तव प्रवास करणे आवश्यकच असल्यास पुढील सावधगिरी बाळगावी:


आजारी असलेल्या लोकांशी संपर्क टाळा.



प्राणी (जिवंत किंवा मृत), प्राण्यांच्या बाजारपेठा आणि जनावरांपासून येणारी उत्पादने (जसे की शिजवलेले मांस) टाळा.



हात साबणाने आणि पाण्याने वारंवार 15 ते 20 सेकंद धुवा. साबण आणि पाणी उपलब्ध नसल्यास कमीतकमी 60% अल्कोहोलसह हँड सॅनिटायझर वापरा.



वृद्ध, वयस्क आणि आधीच अनारोग्याच्या समस्या असणाऱ्या प्रवाश्यांना अधिक गंभीर आजाराचा धोका असू शकतो.



कोरोनाव्हायरस बद्दल जगभरात चिंता वाढत आहे, त्याचप्रमाणे नवीन आरोग्यासाठी असलेल्या धोक्याबद्दल बरेच प्रश्न आहेत. 


नवीन कोरोनाव्हायरसचा आपल्या आरोग्याला काय धोका आहे?
आजकाल कोविड -१९ म्हणून ओळखला जाणारा आजार फ्लूसारखाच दिसतो आहे. ताप, खोकला आणि श्वास लागणे ही मुख्य लक्षणे आहेत. जरी हा एक नवीन विषाणू आहे, परंतु आतापर्यंत असे दिसून आले आहे की लागण होणाऱ्या 80 टक्के लोकांमध्ये आजार सौम्य आहे. अनेक लोकांना बाधा होते तरी त्यांना कोणतीही लक्षणे नसतात. त्यांना कोणताही त्रास होत नाही मात्र ते विषाणूंचे वाहक असतात. सुमारे 20 टक्के लोक आजारी पडतात आणि त्यांना न्यूमोनिया होऊ शकतो. त्यातले 4 टक्के रोग्यांची स्थिती गंभीरपणाकडे झुकते आणि त्यांना अतिदक्षता कक्षात ठेवावे लागते आणि यांत्रिक श्वासोच्छवास देखील आवश्यक पडतो असे दिसून आले आहे. लहान मुले प्रभावित झाल्याचे फारशी दिसत नाहीत. परंतु वृद्ध लोक आणि दीर्घ आजार असलेल्या लोकांना जास्त धोका असतो..


मृत्यू दर काय आहे?
नुकत्याच झालेल्या चिनी प्रादुर्भावाच्या अभ्यासानुसार मृत्यूचे प्रमाण 2.3 टक्के होते. हे नेहमीच्या हंगामी फ्लूच्या मृत्यूच्या दरापेक्षा 20 पट जास्त आहे. चीनमध्ये योग्य वेळी रूग्णालयात दाखल होऊन उपचार सुरू झालेल्या कोविड -१९ रूग्णांच्या आणखी एका अभ्यासानुसार मृत्यूदर 1.1 टक्के इतका घटल्याचे आढळून आले आहे.


कोविड -१९ अन्य फ्लूपेक्षा भिन्न कसा आहे?
कोविड-१९ अधिक संक्रामक आहे. कोविड -१९ मध्ये आजारी पडलेली प्रत्येक व्यक्ती सरासरीने दोन ते तीन लोकांना संक्रमित करते. फ्लूसाठी, ते प्रमाण एक व्यक्तीच्या जवळपास आहे.


कोविड -१९चा प्रसार कसा होतो?
डॉक्टरांचे म्हणणे असे आहे की कोविड-१९ संक्रमणाची प्राथमिक पद्धत फ्लू किंवा सर्दी सारखीच आहे: जेव्हा एखादी संक्रमित व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा विषाणूचा प्रसार करणारे थेंब हवेत फेकले जातात. आणि लगेच खाली पृष्ठभागावर पडतात. आपण खोकला आणि शिंकत असलेल्या व्यक्तीच्या 6 फुटांच्या आत असाल तर ते थेंब आपल्यावर पडू शकतात. अशा क्रियाशील विषाणू असलेल्या एखाद्या पृष्ठभागास आपण स्पर्श केला आणि नंतर आपल्या तोंडाला, नाकाला किंवा डोळ्यांना स्पर्श केला तर आपण संक्रमित होऊ शकता. पृष्ठभागांवर व्हायरस किती काळ टिकतो हे नक्की सांगता येत नाही. पृष्ठभागाचे साहित्य, पृष्ठभागाचा प्रकार, पृष्ठभागाचे तापमान, वाहणारा वारा, हवेतील दमटपणा, थेंबाचा आकार, थेंबातील घटक अशा अनेक बाबींवर थेंबातील विषाणूंची क्रियाशिलता आणि अस्तित्व अवलंबून असते. परंतु अद्याप तपासणी चालू आहे. कोविड -१९ कारणीभूत विषाणू मानवी विष्टेच्या नमुन्यांमधेही आढळला आहे, त्यामुळे तो मलाच्या माध्यमातून पसरणेही शक्य आहे. हा विषाणू हवेत येण्याची आणि वायुद्वारे प्रसार होण्याची शक्यता संशोधकांनी नाकारलेली नाही.


कोविड -१९चा उपचार काय आहे?
हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि चिनी शास्त्रज्ञ यांच्यातील सामंजस्याने यावर काम करीत आहेत. अद्यापपर्यंत तेथे ठोस काही झाले नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने कोविड -१९वर उपचार करू शकतो की नाही हे पाहण्याकरता रेमडेसिव्हिर नावाच्या विषाणूविरोधी चाचणी सुरू केली आहे. परंतु या सर्व प्रयत्नांना महिने लागतात. कदाचित दिड ते दोन वर्षेही लागू शकतील. दरम्यानच्या काळात, कोविड -१९चे रुग्ण रुग्णालयात जातात तेव्हा त्यांना “सहाय्यकारी काळजी” घेणारा औषधोपचार केला जात आहे. जेणे करून, डॉक्टर रुग्णांना श्वासोच्छ्वास घेण्यास आणि त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तींनी विषाणू पराभूत होईपर्यंत संक्रमणांपासून दूर राहण्यास मदत करतात. एडस विरोधात केले जाणारे औषध उपचार उपयोगी पडत असल्याचे दिसून आले आहे.


लस का नाही?
निओ कोरोना व्हायरस हा विषाणू पूर्णपणे नवीन आहे आणि लस तयार करणे ही एक दिर्घकाळ लागणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी खर्च देखील भरपूर येतो. शिवाय अशा लसी व्यापारी दृष्टीकोनातून  फायदेशीर ठरत नाहीत त्यामुळे व्यावसायिक औषध कंपन्यांना अशी लस तयार करण्याच्या प्रेरणा कमी असतात आणि संशोधनालाही प्रोत्साहन कमी मिळते. तरीही, सरकारांच्या आग्रहानुसार काही कंपन्या त्यावर काम करत आहेत. केंब्रिज येथील मॉडर्नना थेरपीटिक्सने एवढ्यातच चाचणीसाठी एक लस सादर केली आहे. अर्थात चाचणी घेण्यास वेळ लागतो. निरोगी लोकसंख्येस लस देण्यापूर्वी यातून हानी होण्याचे धोका कमी आहे आणि उपयोग जास्त आहे अशी खात्री संशोधकांनी करून घेतली की मग त्या लसीची चाचणी आधी जनावरांमध्ये व नंतर लोकांमध्ये करावी लागते. यासाठी बरेच महिने लागतात.


रोगी होणे कसे टाळू शकतो?
तुम्हाला हे ऐकून कंटाळा आला असेलच, परंतु सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडताना तुमचे हात धुणे हा आपला सर्वात चांगला बचाव आहे. अडीअडचणीसाठी हाताच्या सॅनेटिझरची एक छोटी बाटली सोबत ठेवावी. बर्‍याच वेळा हात धुणे यावर जोर द्यावा. हे खरोखर कार्य करते. 
तसेच आपल्या चेहेऱ्याला स्पर्श करणे टाळा. विषाणू आपल्या तोंडातून, नाकातून आणि डोळ्यांद्वारे आपल्या शरीरात शिरतो.
मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. पॉल बिडिंजर म्हणाले की सार्सच्या उद्रेका दरम्यान झालेल्या अभ्यासात असे दिसून आले की हात धुणे आणि चेहऱ्याला होणारा स्पर्श जाणीवपूर्क टाळणे यामुळे आजारपणाचा धोका कित्येक पटीने कमी झाला.


तसेच, आजारी लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि जर आपण स्वत: आजारी असाल तर इतरांपासून दूरच रहा – रुमालात किंवा आपल्या बाहीमध्ये खोका, शिंका. रुमाल कपडे वरचेवर बदला, स्वच्छ ठेवा. घरीच रहा. स्वतंत्र खोलीत रहा. तसे केलेत तर सतत फेस मास्क वापरला नाहीत तरी चालेल.  आपल्या समोर कोणी आल्यास मात्र नाक तोंड झाकून घ्या. आपण श्वसनाच्या आजाराने आजारी असल्यामुळे इतरांना आपल्यामुळे लागण लागणार नाही याची जबाबदारी तुमच्यावर जास्त आहे. आपण क्लिनिकच्या प्रतीक्षालयासारख्या ठिकाणी गेल्यावर फेस मास्क घातल्यास आपण आपला आजार इतरांपर्यंत पसरवणे टाळू शकता. निरोगी माणसांना फेस मास्कची गरज नाही. फेस मास्क कसा वापरावा याबद्दल माहिती करून घ्या. एक फेस मास्क एकदाच आणि काही तासांपुरतात वापरता येतो हे लक्षात घ्या. एखादाच फेस मास्क आपले संरक्षण कायम करणार नाही. तुमच्यापेक्षा आरोग्य सेवा करणाऱ्यांना फेस मास्कची आवश्यकता अधिक आहे. विनाकारण फेस मास्क वापरून त्याच्या जागतिक कमतरतेस हातभार लावू नका.


किती काळजी करावी? घ्यावी?
आपल्याला अद्याप या विषाणूबद्दल आणि तो देशभर आणखी दूरवर पसरण्यास सुरवात झाली तर त्याचे कार्य कसे होईल याबद्दल माहित नाही. कदाचित याचा परिणाम केवळ काही विशिष्ट प्रदेशांवर होईल किंवा काही लोक आजारी पडतील. कदाचित यामुळे हॉस्पिटलचे वॉर्ड ओसंडून वाहतील, स्मशानांमधील वर्दळ वाढेल आणि देशभर दु:खाचे टाहो फुटतील. किंवा कदाचित परिणाम याच्या अधले मधले असतील. त्यामुळे दडपून जाण्यापेक्षा भावी दुष्परिणाम कमीत कमी कसे करता येतील त्या दृष्टीने प्रत्येकाने बावचळून न जाता आपापली जबाबदारी निभावली पाहीजे. आपला उद्धार आपणच केला पहिजे.