'सैराट' विचार करायला | लावणारी कलाकृती
'सैराट' नागराज मंजुळेंनी खूप मेहनत घेऊन मराठी चित्रपट सृष्टीला दिलेली अनोखी कलाकृती आहे असेच म्हणावे लागेल. सैराटचा ट्रेलर पडद्यावर झळकला आणि ज्यांना नागराजमुळे आपले अस्तित्वाला तडा जाईल असे वाटत होते असे लोक व त्यांच्या विचारधारेला विरोध करणारी जमात, सोशल मिडीयावर चित्रपटाबाबत मराठा विरुद्ध दुसऱ्या जातींमध्ये संघर्ष निर्माण करून देऊन वादाला तोंड फोडले. त्यांच्या म्हणण्यानुसार मराठा समाजातील मुलगी हिरोईन दाखवून मराठा समाजाला बदनाम केले आहे. या चित्रपटामुळे मुला-मुलींच्या बालमनावर विपरीत परिणाम होतील, ते वाया जातील अशी बोंबाबोंब सोशल मिडीयावर सुरु केली. त्यामुळे सैराट चित्रपटाची उत्कंठा एवढी वाढली कि सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहीला आणि बाहेर पडताना सुन्न होऊन मनामध्ये विचारांचे वादळ निर्माण करून देणारीच कलाकृती आहे नागराज मंजुळेंच्या या 'सैराट' बाबत केलेले गैरसमज खरोखर गैरसमजच आहेत म्हणतच बाहेर पडले. 'सैराट' म्हणजे ग्रामीण जीवन जगणाऱ्या गावातील मुला-मुलींचे एकमेकांबद्दल असलेले आकर्षण, त्यामधून होणारा संवाद, त्यांना येणाऱ्या अडचणी कशा प्रकारे असतात त्या प्रखरपणे मांडताना एक आकर्षक प्रेमकहाणी रंगविलेली आहे. या प्रेमकहाणीमध्ये ग्रामीण भागातील क्रिकेट स्पर्धा, ग्रामीण जीवनातील पोहण्या चा आनंद, शेतामध्ये भटकणे, गावातील ग्रामीण व्यवस्थेचे व राजकारणाचे अगदी वास्तव मांडले आहे. हे मांडत असताना प्रत्येक प्रसंग अगदी परफेक्ट चित्रित केला गेला आहे. शिवाय चित्रपटातील एकही प्रसंग अतिशयोक्ती न दाखविता अगदी सहजपणे योग्य असे दाखवून प्रेक्षकांना भुरळ पाडण्यास यशस्वी झाला आहे.
परंतु 'सैराट' पहायला एवढे लोक उतावीळ का झाले होते याचाही विचार करायला हवा. कारण ग्रामीण भागातील लोकांच्या मनातील ग्रामीण जीवन यामध्ये आहे. तशी परिस्थिती चित्रित केली असल्याने ग्रामीण जीवन जगत असलेले, यापूर्वी ग्रामीण जीवन जगलेले पण आता शहरात स्थिरस्थावर झालेल्या प्रत्येकाला आपण त्या चित्रपटाचा एक भागच आहोत किंवा आपण या आर्ची परशाच्या आजूबाजूला वावरणारे लोक आहोत याची जाणीव करून देण्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे यशस्वी ठरले असल्यानेच गावातील व शहरातील लोक चित्रपटगृहाकडे वळले आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत प्रथमता: ग्रामीण जीवन आहे तसे दाखवण्यात यशस्वी किमया त्यांनी साधली आहे. चित्रपट आज एवढ्या मोठ्या उंचीवर जाऊन पोहचला आहे की, चित्रपटाबाबत बोंबाबोंब करून प्रेक्षकाला भडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अपप्रवृत्तीला कोणतीच टीका करण्यास जागा ठेवली गेली नाही, तरीही शहरी जीवन जगणारे एसी मध्ये बसून उंटावरून शेळ्या हाकणारे म्हणतात प्रसंग एकरूप जाणवत नाही, कथा बरोबर नाही, ग्रामीण जीवन बेगडी दाखविले आहे, आपले अतिज्ञान दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांची तोंडे प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद देऊन बंद केली आहेत. खरच, नागराज मंजुळेंनी गावातील पाटीलकी, व त्याचे भोवती फिरत असणारे गावचे जनजीवन दाखवून त्यांच्या घरातील मुलगी कशी सर्व बंधने तोडून नवीन युगाचे नेतृत्व बेधडक करते आहे. तर दुसऱ्या बाजूला जातीय सलोखा, जात पंचायतीचे वास्तव, ग्रामीण मुलांचे महाविद्यालयीन जीवन यांना एकत्रित करून गावागावांमध्ये वावरणारे हजारो अर्ध्या व परश्याच्या जीवनाला स्पर्श करतात, कोणतीही जातीय भांडणे न दाखविता प्रेमप्रकरणातून अनेकांचे संसार फुलत आहेत. हे प्रेमवीर आपले जीवन व्यवस्थित जगत असतात. त्यांनाही जीवन जगू द्या. कृपया त्यांचाही संसार आपल्या सारखाच चालू आहे. त्यांना त्रास देऊ नका असा संदेश घेऊन प्रत्येक माणूस बाहेर पडेल, एवढी प्रभावी कलाकृती 'सैराट'च्या रूपाने साकारली आहे. या मधून आपण समाजात वागताना आई, वडील, भाऊ, मित्र किंवा स्वत: कशा प्रकारे वागले पाहिजे याचेही चक्र डोक्यात घोंगावतच चित्रपट गृहात गेलेल्या प्रत्येकाचे पैसे 'सैराट' वसूल करून देत आहे, असे मला तरी वाटते. असो 'नागराज मंजुळे तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा...