कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी आत्ताच एखाद्या सरकारी दवाखान्याची इमारत किंवा वसतीगृहामध्ये कोरनटाईन वार्ड व विलगिकरण कक्ष करण्यासाठी तयारी करा, तालुक्यातील कार्यकर्त्यांची टिम तयार करून त्यांना प्रशिक्षण दया व गरजेच्या वेळी त्यांचा उपायोग करा, त्यांच्या मार्फत लोकांमध्ये जनजागृती करा, अशा सुचना राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अधिका-यांना दिल्या.
मंचर येथे शासकिय विश्रामगृहात दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव, शिरूर तालुक्यातील प्रमुख अधिकारी व पदाधिका-यांची कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या व करावयाच्या उपाययोजना बाबत बैठक घेतली. यावेळी प्रांतअधिकारी जितेंद्र डूडी, आंबेगाव च्या तहसिलदार रमा जोशी, शिरूरच्या तहसिलदार लैला शेख, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.एस.ढेकळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन देवदत्त निकम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णुकाका हिंगे हे उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा संसर्ग चा सामना करण्यासाठी तयारीला लागा. लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करा, गांभीर्य समजून सांगा. लग्न समांरभ टाळा. यासाठी सर्वपक्षिय कार्यकर्त्यांना एकत्र घ्या. तालुक्यातील खाजगी डॉक्टरांची मदत घ्या. आत्ताच एखादे वसतीगृह किंवा सरकारी दवाखन्याची इमारत कोरनटाईन वार्ड व विलगिकरण कक्ष तयार करून ठेवा, अशा सुचना दिल्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी लोकांना घरी थांबवण्यासाठी प्रयत्न करा. संसर्ग होवू नये, असे वाटत असेल तर लोकांनी एकत्र येण्याचे टाळा, असे अवाहन दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केले.