अन्नदात्याप्रती अन्नत्याग संवेदना आंंदोलन.

  •  


आजच्या दिवशी १९ मार्च १९८६ रोजी पहिली शेतकरी आत्महत्या झाली. साहेबराव करपे ( चिलगव्हाण, यवतमाळ) यांनी या दिवशी पत्नी, चार मुलांसहित आत्महत्या केली. आत्तापर्यंत साधारणपणे चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आणि सरासरी दररोज ४० ते ५० शेतकरी आत्महत्या होत आहेत. 


     शेतकरी शेतमजूर अन्नदाता हा उन्ह, पाऊस, थंडीची तमा न बाळगता काबाडकष्ट करतो. अनेकदा उपाशी राहून काम करतो. मात्र या कष्टकऱ्यांच्या पदरी काय पडते ? सारे जीवनच वेदनादायी !! या वेदना इतरांनी अनुभवल्याशिवाय समजणार नाहीत, हे खरेच आहे. पण या उपाशीतापाशीपोटी काबाडकष्ट करणाऱ्या या कष्टकऱ्यांच्या वेदना  समजून घेण्याचा आणि त्यांच्याशी आपले आंतरिक नाते अधिक दृढ करण्यासाठी आम्ही आज एक दिवस अन्नत्याग आंदोलन करत आहोत. एक दिवस अन्नाचा कणही न खाता त्यातून निर्माण होणारी शारीरिक, मानसिक आणि विचारांच्या पातळीवरील वेदना या कष्टकऱ्यांच्या सहवेदनेशी जोडण्याचा प्रयत्न करत आहोत.


    मी जरी पुण्यात पत्रकार-कार्यकर्ता म्हणून कार्यरत असलो तरी मी स्वतः शेतकरी कुटुंबातील आहे. अल्पभूधारक आहे. 15 वर्षपूर्वी मी थोडे काम शेतीत केले आहे. घरकाम करून वेळेत शेतमजुरीला जायचे म्हणून आठवड्यातील काही दिवस तरी उपाशीपोटी कामावर गेलेली माझी आई विमल हिची वेदना मला माहित आहे, ही आजच्या दिवशी स्मरण करावी अशी गोष्ट आहे. एकूणच शेती कष्टकऱ्यांच्याप्रती सहवेदना दृढ करण्याचा आजचा दिवस !!


      सरकारी धोरण, व्यापारी, बाजार समित्या आणि शेतकऱ्यांना गळफास ठरलेले कायदे यामुळे शेती कष्टकरी रसातळाला गेला आहे. कमाल शेतजमीन धारणा कायदा (सिलिंग), आवश्यक वस्तूंचा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा हे शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची *किसानपुत्र आंदोलन संघटनेची* मागणी आहे. आजच्या अन्नत्याग आंदोलनातून सरकारला शेतकष्टकऱ्यांच्या मागण्या समजाव्यात, ही आशा आहे. 


◆ विशाल व्ही जी, पुणे 
     7276559318