भगवान महावीर जगातील मोठे पर्यावरणवादी___ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भगवान महावीर जगातील मोठे पर्यावरणवादी___ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



नागपूर : भगवान महावीर जगातील मोठे पर्यावरणवादी होते. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी 42 वर्षे त्यांनी भारतभ्रमण केले. त्यांनी समाजाला दिलेली शिकवण प्रत्येकाने आचरणात आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. चिटणवीस पार्क येथे श्री. जैन सेवा मंडळातर्फे आयोजित भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव 2016 या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, गिरीश व्यास, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या वाणी बुद्धीवर विजय मिळविण्याची शिकवण भगवान महावीर यांनी दिली. दुसऱ्याशी संघर्ष करण्यापेक्षा स्वत:तील वाईट प्रवत्तीवर विजय प्राप्त करण्याचा संदेश दिला. हा संदेश प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे. राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू करुन भूतदयेचा विचार समाजात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून गोधन व पशुधन कमी झाल्यास त्याचा परिणाम कृषी व्यवस्थेवर होतो. त्याचे वाईट परिणाम आता आपण राज्यात भोगत आहोत, असेही त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात मांगीतुंगी महोत्सव सरकाने पुढाकार घेवून साजरा केला. या परिसराचा तीर्थस्थळ म्हणून विकास करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला. त्यापैकी 40 कोटी रुपये खर्च झाले आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारे हा महोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. जैन समाज हा प्रागतिक समाज आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. व्यापार वाढविण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे शासन ठामपणे जैन समाजाच्या पाठिशी राहील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण व दीपप्रज्वलन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचा शाल, श्रीफळ व पगडी देऊन स्वागत केले. यावेळी स्मृति चिन्हाचे प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी श्री. जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष मनीष मेहता यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी राज्यात गोवंश हत्याबंदी केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन केले. ही संस्था समस्त जैन समाजाची एकमात्र प्रतिनिधी संस्था आहे. यात 85 संस्थांचा समावेश असन 65 हजार सदस्य असल्याचे सांगितले. जैन भवनासाठी ही एखादे हॉस्पिटल चालविण्यासाठी देणे. तसेच या संस्थेतर्फे अहिंसा अवार्ड देण्यात येत असल्याची माहिती दिली. यावेळी मुनिराज प्रशमरति विजय म.सा., सुपार्श्वसागर, म.स.गुणनंदीजी यांनी उपस्थितांना आशीर्वाद दिले. सूत्रसंचालन मंत्री सतीश पेंढारी (जैन) यांनी केले. यावेळी नगरसेविका आभा पांडे, दिलीप गांधी, विजय उदापूरकर, शरद मचाले, दीपक शेंडेकर, संजय टक्कामोरे, पंकज बोहरा, डॉ. कमल पुगलिया, रवींद्र आग्रेकर, अतूल कोटेचा, रिंकू जैन, योगेंद्र शहा, जितेंद्र तोरावत, देवेंद्र आग्रेकर, संजय नेताजी, जयप्रकाश गुप्ता व इतर जैन बांधव उपस्थित होते.