जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा- राज्यपाल

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा- राज्यपाल


घेऊन पुणे (प्रतिनिधी) : बदलत्या काळात जनतेच्या शासनाकडून खूप अपेक्षा आहेत. यासाठी प्रत्येक फाईल हाताळताना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या त्याचा जनतेवर परिणाम होत असतो. ही बाब लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोनाबरोबरच उच्च नैतिक मूल्य, सच्चा मानवीय दृष्टिकोन बाळगावा. आपल्या निर्णयांचा परिणाम समाजातील सर्व घटकावर होणार असतो. समाजातील गरिबातल्या गरीब माणसाचे कल्याण तुमच्या निर्णयांवर अवलंबून आहे. यामुळे गरिबांविषयी कनवाळू आणि दयाळू दृष्टिकोन ठेवा, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.



__ राज्यसेवा परीक्षेत विविध पदावर 'अ' श्रेणी वर्गात निवडलेल्या अधिकाऱ्यांच्या तिसऱ्या परिवेक्षाधीन संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम २०१६ (सीपीटीपी)च्या उपक्रमाचा शुभारंभ राज्यपालांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने येथील यशदा संस्थेत झाला. यावेळी परिवेक्षाधीन अधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, यशदाचे महासंचालक आनंद लिमये, जिल्हाधिकारी सौरभ राव, सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अधिकारी प्रशिक्षण संचालक ज्ञानदेव तळुले, सहप्राध्यापक मृणालिनी निंबाळकर आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, शासकीय नोकरीत तुम्हाला नियमित वेतन आणि हमखास बढती मिळणार आहे. परंतु शेतकरी आणि सामान्य कामगारांना ही सुविधा मिळत नाही. यामुळे तुम्ही सर्वोत्तम सेवा समाजाला दिली पाहिजे. मी तुम्हाला आवाहन करतो आहे, की तुम्ही जेथे जाल तेथे कटिबद्धपणे काम करीत रहा. जरी तुमची बदली झाली असली तरी प्रसंगी तेथे जाऊन त्याठिकाणी काय बदल झाला आहे, याची पडताळणी घेत रहा. मला खात्री आहे या संयुक्त प्रशिक्षणामध्ये तुमच्यात नेतृत्व गुण, त्याचप्रमाणे आपआपसात मैत्रीभाव निर्माण होईल आणि एक टीम म्हणून तुम्ही उत्तम त-हेची प्रशासकीय सेवा राज्याला द्याल. आदिवासी क्षेत्रात आणि अन्य क्षेत्रात विकासामध्ये तफावत आहे. मला वाटते तुम्ही स्वेच्छेने ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात काम करायला गेले पाहिजे. तुम्ही तेथील लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध राहून नक्कीच चांगला बदल त्यांच्या आयुष्यात घडवू शकता. सामान्य माणसांच्या क्षमतांचे सबलीकरण करण्यासाठी आणि विकास अधिक गतीने सर्वसमावेशक पद्धतीने करण्यासाठी शासनाने भविष्यातील बदल घडविणारे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यासाठी आपण डिजीटल इंडिया, स्वच्छ भारत, मेक इन । इंडिया, स्कील इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्मार्ट सिटी मिशन आणि अन्य राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी आपल्यातले सर्वोत्तम प्रशासकीय योगदान देऊन हे उपक्रम आपण यशस्वी करावेत, असे राज्यपाल म्हणाले. अखिल भारतीय प्रशासनिक सेवेच्या तुलनेत राज्यसेवा तितक्याच बरोबरीची आहे. तुम्ही धीटपणाने तुमचे मत आणि सल्ला दिला पाहिजे. परंतु असे करताना तुमच्या पुढे आलेल्या बाबींकडे नकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचार करू नका, आवाहनही त्यांनी केले. मागील आठवड्यात आदिवासी विकास विभागाने जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेसाठी ऑनलाइन यंत्रणा विकसित केली आहे. अशा त-हेचे काम सर्वच विभागाकडून झाले तर प्रशासन लोकाभिमुख आणि लोक सहायक होईल. राज्य शासनाने सेवा हमी कायदा अंमलात आणला आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले की, शासनाने ३१९ सेवांपैकी १५६ सेवा ऑनलाईन दिल्या आहेत. उर्वरित सेवा २ ऑक्टोबर २०१६ ला देण्यात येतील. या प्रक्रियेत आपण अतिशय महत्वाची भूमिका बजावणार आहात हे लक्षात ठेवा. येत्या काळात लोकांना शासकीय कार्यालयात जाण्याची गरज राह नये असे मला वाटते. राज्य शासनाच्या सेवा लोकांपर्यंत अधिकाऱ्यांनी पोहोचाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज आपला देश जगातील सर्वात तरुण आहे. हा तरुण देश अस्वस्थ आहे. तो आपल्या हक्कांविषयीही जागरूक आहे. या तरुण देशाला उद्योगाला आणि उद्यमशीलतेला सहाय्य ठरणारे प्रशासन हवे आहे. त्यांना सक्षम आणि तत्काळ शासनाकडून निर्णयांची अपेक्षा आहे. या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आहे. महाराष्ट्राने आत्तापर्यंत आर्थिक आणि मानव विकासात मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे. तथापि, आजही आपल्यापुढे गरिबी, बेरोजगारी आणि वेगवेगळ्या विभागामध्ये विकासात तफावत आहे, असे सांगून राज्यपाल श्री. राव म्हणाले की, गेल्या चार वर्षांपासून मराठवाड्यात आणि अन्य काही तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. या दुष्काळाने लाखो शेतकरी आणि सामान्य माणूस जो कृषी व्यवस्थेवर अवलंबून आहे त्यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. या समस्यांना सोडविण्यासाठी आपल्या सारख्या अधिकाऱ्यांनी काम करावे, अशी लोकांची अपेक्षा आहे. ही अपेक्षा पूर्ण करताना सचोटीने, प्रामाणिकपणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करा. लोककल्याणकारी राज्याची अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, असेही ते म्हणाले. नोकरशाहीने शेवटच्या माणसाचा विकास करावा, लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी कसोसीने काम करावे. लोकशाहीचे मर्म हे सार्वजनिक हित साध्य करण्यातच आहे असे सांगून राज्यपालांनी सर्व परिवेक्षाधीन अधिकाऱ्यांचेही अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक व स्वागत महासंचालक श्री. लिमये यांनी केले. आभार प्रशिक्षण संचालक श्री. तळुले यांनी केले. ।