मंचरमध्ये  शिवभोजन थाळी सुरु,गरजुंना मिळणार मोफत जेवण 


मंचर शहरातील एसटी बसस्थानकाजवळ हॉटेल आस्वाद येथे ५ रुपयांत शिवभोजन थाळी उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना उपनेते शिवाजीदादा आढळराव पाटील व आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी   शिवभोजन केंद्र चालकास आगाऊ रक्कम जमा केल्याने गरजुंना लॉकडाऊनच्या काळात मोफत जेवण मिळणार आहे.


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचा अभिनव उपक्रम शिवभोजन थाळी महाराष्ट्र राज्यात  सर्वत्र  राबवला जातो आहे. आता हा उपक्रम मंचर येथेही सुरु करण्यात आला आहे.या शिवभोजन थाळीच्या माध्यमातून मंचर व परिसरातील सर्व गरीब व गरजू व्यक्तींना  उपक्रमाचा लाभ होणार आहे. 


माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या  सूचनेवरून  मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी कोरोनामुळे सध्या असलेले लॉकडाऊन उठेपर्यंत  या उपक्रमातील  लाभार्थ्यास भरावी लागणारी प्रति थाळी ५ रुपये रक्कम आगाऊ चेक स्वरूपात केंद्र चालकास अदा केली आहे. त्यामुळे  संचारबंदी उठेपर्यंत याठिकाणी गरजूना  मोफत जेवण मिळणार आहे.. हे शिवभोजन सुरु झाल्याने अनेक गरीब कुटुबांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहे.


यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बेंडे पाटील, अरुणनाना बाणखेले, राजु  इनामदार, रंगनाथ थोरात, सागर काजळे, संदीप बाणखेले आदी ग्रामस्थ  उपस्थित होते.