ऊसतोडणी मजुरांचा घरी सोडण्यासाठी भिमाशंकर साखर कारखान्यासमोर ठिय्या.

कोरोनो व्हायरसच्या भीतीमुळे पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या   ऊसतोड कामगारांनी ऊसतोडणी करण्यास  नकार देवुन कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या मांडला आहे.


आम्हाला आमच्या घरी सोडवण्याची व्यवस्था करा. अशी मागणी कारखाना व्यवस्थापन व पोलिस यंत्रणेकडे केले आहे. यावेळी खेड उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे व मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक  कृष्णदेव खराडे यांनी कारखाना प्रशासनाशी चर्चा करुन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन मजुरांना  दिले आहे.


या मजुरांनी ऊसतोडणी करण्यास नकार दिल्यास ऊस तोडणी न झालेल्या शेतकर्यांचे मोठे  नुकसान होण्याची शक्यता आहे.                        .                


कोरोनो व्हायरस चे संकट देशावर आले आहे. त्यामधुन सावरण्यासाठी शासनाने सर्वत्र प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी संपुर्ण देश लॉकडाऊन केला आहे. या लॉकडाऊन मधुन शेतीच्या कामांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक साखर कारखाने  सुरु आहेत.


सर्वच साखर कारखान्यांनी सर्व ऊसतोडणी मजुरांची योग्य प्रकारे काळजी घेतली आहे. त्यांना सँनिटायझर व मास्कचा पुरवठा केला आहे. तरीही पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर साखर कारखान्यावरील मजुरांनी अचानक काम बंद करुन कारखान्यांच्या प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या मांडला व आम्हाला आमच्या गावाला सोडण्याची व्यवस्था करा अशी मागणी केली .


यावेळी  मजुंराबरोबर कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे आदीनी  चर्चा केली. मजुरांना सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ऊसतोड कामगारांनी ठिय्या सोडला


. मात्र ऊसतोड कामगारांच्या या पावित्र्यामुळे ऊसतोडणी न झालेल्या शेतकर्यांची चिंता वाढली असुन  शासनाने योग्य निर्णय घेवुन शेतकर्यांच्यी ऊसतोडणीचे नियोजन करण्याची मागणी केली आहे.