पुणे जिल्हा परिषद अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील २३० अंगणवाडी केंद्रामध्ये कडधान्य पावतीवर १५०० ग्रॅम हरबरा डाळ व मसुरडाळ 1400ग्रँम वाटप करण्याचे आदेश असतानाही प्रत्यक्ष ७५० ग्रॅम हरबरा व मसुर डाळ वाटण्यात आली .याबाबत जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव व धामणी बीट मधील २३० अंगणवाड्यांमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत पोषण आहार म्हणून तांदूळ, गहू, मसूर डाळ, हरबरा डाळ, मिरची पावडर, हळद, मीठ, तेल यांचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्यक्षात हरभरा डाळीचे व मसूर डाळीचे वाटप करत असताना पावतीवर हरबराडाळ १५०० ग्रॅम व मसूरडाळ १४०० ग्रॅम वाटल्याबाबत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून फसवून सह्या घेतल्या गेल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र मसूर व चणाडाळ यांची ७५० ग्रॅम ची पाकिटे वाटण्यात आली आहेत.
अन्य कडधान्याच्या पाकिटावर पुरवठादाराचे नाव, वजन, एक्सपायरी डेट टाकली गेली परंतु चणाडाळीच्या पाकिटावर कुठल्याही प्रकारचा उल्लेख नसल्याचे त्यांनी उघडकीस आणले आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी बालकांच्या उपस्थितीती पेक्षा कमी मालाचा पुरवठा केला आहे. सीडीओ पी यांनी ११ एप्रिल २०२० रोजी मालाचा पुरवठा केला असून दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी माल मोजून घ्या असा एसएमएस केला असून प्रत्यक्षात माल वाटप करून झाल्यानंतर हा निरोप दिला गेला असल्याने संबंधीत व्यवहारात अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची नाकारता येत नाही.
याबाबत रविंद्र करंजखेले म्हणाले की, या गंभीर प्रकरणामध्ये बालकांच्या पोषण आहाराचे पुरवठादार, राज्य कन्झ्युमर फेडरेशन आणि संबंधित बालविकास अधिकारी यांचे संगनमतनुसार हा प्रकार घडला असल्यामुळे पुरवठादाराने डाळीचा निम्मा पुरवठा केला असताना देखील संपूर्ण पुरवठा केला असल्याचे दाखवून पावतीवर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची फसवून सही घेण्यात आली आहे. हा प्रकार गंभीर असून राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे या अंतर्गत अत्यावश्यक सेवा म्हणून तीन ते सहा वयोगटातील बालकांना घरपोच पोषण आहार देताना त्यांना निम्मा पुरवठा करून एक प्रकारे उपाशी ठेवण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी स्वतंत्र चौकशी समिती नेमून दोषी अधिकारी व पुरवठादारांवर बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा असे करंजखेले यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.